धाराशिव :
धाराशिव जिल्ह्यातील किनी गावात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे कृषी संकट उभे राहिले आहे. बीजप्रक्रियेसाठी वापरण्यात आलेल्या औषधामुळे सोयाबीनची उगवण प्रभावित झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
किनी गावातील सुमारे २५० एकर क्षेत्रातील सोयाबीन पिकाला याचा मोठा फटका बसला असून अनेक शेतांमध्ये सोयाबीनची उगवणच झाली नसल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी उगवलेले पीकही योग्य वाढ न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बीजप्रक्रिया न केलेल्या बियाण्यांची उगवण चांगली झाली आहे. मात्र डीकॉन्स कंपनीच्या 'सिकाडा' औषधाने बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उगवणीची समस्या निर्माण झाली आहे.
या प्रकरणाची दखल घेत कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित शेतांची पाहणी केली आहे. लाखो रुपयांचा खर्च करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी तसेच दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.


