राज्यात दुष्काळाचे सावट असताना शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर पीक कर्ज न देणाऱ्या तसेच जुन्या कर्जाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांवर दबाव आणणाऱ्या बँका आणि यंत्रणांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज मिळणं आणि दुष्काळाच्या काळात कर्जवसुलीचा तगादा थांबणं आवश्यक असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांशी लढणाऱ्यांना आडवे केल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या अल्पमुदत खरीप पीक कर्जाच्या पुनर्गठनाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही बँकांना देण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांनी संकटाच्या काळात टोकाचा निर्णय घेऊ नये, सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. मागील वर्षी अतिवृष्टीच्या काळातही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ दिली नाही, असा दावा त्यांनी केला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


