जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात पावसाचे कमी प्रमाण आणि अनियमित वितरण यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकडून अपेक्षा ठेवत हरभऱ्याची पेरणी केली. मात्र, पेरणीनंतर पंधरा दिवसांहून अधिक काळ उलटूनही हरभऱ्याची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
शेतकऱ्यांनी बैलजोडी आणि मजुरांच्या मदतीने हरभऱ्याची पेरणी केली. मात्र, शेतात काही ठिकाणीच हरभऱ्याची रोपे दिसत आहेत. काही शेतकऱ्यांनी जमीन उकरून पाहिली असता हरभऱ्याचे बियाणे जमिनीत जसेच्या तसे असल्याचे आढळून आले. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे बियाण्यांना अंकुर फुटले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
आधीच खरीप हंगामात पावसाअभावी नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यातच रब्बी हंगामातील हरभऱ्याची उगवण रखडल्याने उत्पादन मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. हरभऱ्याचे पीक उगवले नाही, तर बियाणे आणि पेरणीसाठी केलेला खर्च वसूल होणार नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
खरीप हंगामानंतर रब्बी हंगामावरही संकटाची शक्यता निर्माण झाल्याने चोपडा तालुक्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता हरभऱ्याची उगवण होणार का आणि झालेल्या खर्चातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.


