महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गट-ब परीक्षेतील रिक्त पदांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. २०२३ मध्ये झालेल्या गट-ब परीक्षेतील दोन हजार ७४१ रिक्त पदांसाठी प्रतीक्षा यादी जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी उद्या, २८ ऑक्टोबर रोजी न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती आमदार विक्रम पाचपुते यांनी दिली.
पाचपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये झालेल्या गट-ब परीक्षेसाठी सात हजारांहून अधिक पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र, या प्रक्रियेत एकूण दोन हजार ७४१ पदे रिक्त राहिल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये खुल्या प्रवर्गातील ४७८ पदांचा समावेश असल्याचा दावाही त्यांनी केला.
या रिक्त पदांबाबत विद्यार्थ्यांकडून वेळोवेळी मागणी करण्यात आली होती. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. रिक्त पदांसाठी प्रतीक्षा यादी जाहीर करावी आणि भरती प्रक्रियेबाबत स्पष्टता द्यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिवांसोबत झालेल्या चर्चेचाही पाचपुते यांनी उल्लेख केला. व्यस्त वेळापत्रकातून मुख्य सचिवांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेतल्या आणि हा विषय मार्गी लावण्याबाबत आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, उद्या न्यायालयात सादर होणारे प्रतिज्ञापत्र (ॲफिडेव्हिट) महत्त्वाचे ठरणार आहे. शासनाकडून या प्रकरणात कोणती भूमिका मांडली जाते आणि रिक्त पदांबाबत काय स्पष्टता मिळते, याकडे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. आगामी भरती प्रक्रियेबाबतही विद्यार्थ्यांमध्ये स्पष्टता निर्माण होण्याची गरज असल्याचे पाचपुते यांनी नमूद केले.


