जालन्याच्या अंतरवाली सराटी येथे ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या आंदोलकांना पोलिस प्रशासनाकडून अटकाव केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ॲड. मंगेश ससाणे यांच्यासह चार प्रमुख आंदोलक आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणासाठी स्टेज उभारणी सुरू केली असता, पोलिस प्रशासनाने परवानगीचे कारण देत स्टेज उभारण्यास विरोध केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

तसेच, उपोषणाचे ठिकाण इतरत्र हलवण्याचे निर्देश पोलिसांकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या भूमिकेवरून ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांनी पोलिस प्रशासनावर पक्षपाती कारभाराचा गंभीर आरोप केला.

“मनोज जरांगे यांना एक न्याय आणि आम्हाला वेगळा का?” असा सवाल ससाणे यांनी उपस्थित केला आहे. उपोषण मोडून काढण्यासाठी बळाचा वापर केला जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

पोलिस प्रशासन आणि ओबीसी आंदोलकांमधील या तणावामुळे अंतरवाली सराटी येथे परिस्थिती काय वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.