गणेश विसर्जनानंतर संकलित करण्यात येणाऱ्या सव्वादोन लाखांहून अधिक गणेशमूर्तींची विल्हेवाट कशी लावायची, असा मोठा पेच नाशिक महापालिकेसमोर निर्माण झाला आहे. दरवर्षी विसर्जनानंतर संकलित केलेल्या गणेशमूर्तींची मलनिस्सारण केंद्रांच्या परिसरात खड्डे खोदून विधीवत विल्हेवाट लावली जाते. मात्र यंदा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रांच्या अपग्रेडेशनची कामे सुरू असल्याने परिस्थिती बदलली आहे.

मलनिस्सारण व यांत्रिकी विभागाने बांधकाम विभागाला सूचना देत मलनिस्सारण केंद्रांच्या परिसरात यंदा गणेशमूर्तींची विल्हेवाट लावू नये, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विसर्जनानंतर संकलित होणाऱ्या मोठ्या संख्येतील गणेशमूर्तींची विल्हेवाट लावण्यासाठी आता महापालिकेला पर्यायी जागा आणि योग्य पद्धतीचा शोध घ्यावा लागणार आहे.

दरवर्षी गणेशोत्सवानंतर महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती संकलित केल्या जातात. यंदा हा आकडा सव्वादोन लाखांहून अधिक असण्याची शक्यता असल्याने त्यांच्या व्यवस्थापनाचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यातच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा भाग म्हणून विविध मलनिस्सारण केंद्रांमध्ये अपग्रेडेशनची कामे सुरू असल्याने पारंपरिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा पर्याय उपलब्ध राहिलेला नाही.

त्यामुळे संकलित होणाऱ्या लाखो गणेशमूर्तींची विल्हेवाट कुठे आणि कोणत्या पद्धतीने लावली जाणार, याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे. पर्यावरणाची काळजी घेत गणेशमूर्तींचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी महापालिका प्रशासनासमोर मोठे नियोजनाचे आव्हान उभे राहिले आहे.