नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, मोठमोठे खड्डे आणि त्यामध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था अधिकच वाढल्याने वाहतुकीवरही परिणाम होत आहे.

खड्ड्यांमुळे वाहनचालकांना रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच खराब रस्त्यांमुळे वाहनांचेही नुकसान होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन काठे गल्लीतील रस्ता तातडीने दुरुस्त करावा आणि नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.