नाशिकरोड परिसरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात नाशिक महापालिका प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते ओम हॉस्पिटल या मार्गावर रहदारीला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या, अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनरवर मनपाच्या पथकाने कारवाई केली.

या मार्गावर विविध ठिकाणी हातगाड्या आणि अनधिकृत जाहिरात फलक लावण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर मनपा प्रशासनाने कारवाई करत रस्त्यावरील अडथळे दूर करण्याची मोहीम हाती घेतली.

कारवाईदरम्यान रस्त्यालगत उभ्या असलेल्या हातगाड्यांवर तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनरवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे संबंधित मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

नाशिकरोड परिसरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असल्याने मनपा प्रशासनाने सातत्याने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, पुढील काळातही अशा प्रकारची कारवाई सुरू राहणार का, याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.