सिडकोतील सह्याद्रीनगर परिसरात मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेल्या मोठ्या खड्ड्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन अडकल्याची घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकमधील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे दिसत नसल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. अशाच एका पाण्याखाली गेलेल्या खड्ड्यात सह्याद्रीनगर परिसरातील स्कूल व्हॅन अडकली.
घटनेनंतर चालकाने तत्काळ प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वाहनातून खाली उतरवले. त्यानंतर दुसरी स्कूल व्हॅन बोलावून विद्यार्थ्यांना शाळेकडे रवाना करण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची माहिती उपलब्ध नाही.
दरम्यान, पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीचे दावे करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सिडको परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचत असल्याने अपघातांचा धोका वाढला असून खड्डे तातडीने बुजवून प्रभावी पाणी निचऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


