नाशिकच्या हिरावाडी पाट परिसरातील वर विनायक मंदिराशेजारी गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू असल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित विभागाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, पाईपलाईनमधील गळतीमुळे रस्त्यावर सतत पाणी वाहत असून अनेक दिवस उलटूनही दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. पाणीगळतीमुळे मौल्यवान पाण्याची नासाडी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
एकीकडे प्रशासनाकडून पाणी बचतीचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या समस्येमुळे परिसरातील नागरिकांनाही गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
संबंधित विभागाने तातडीने पाईपलाईनची दुरुस्ती करून पाणीगळती थांबवावी आणि भविष्यात अशी समस्या निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे.


