दिशा सालियन मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याचे निर्देश दिले असून, CBIला FIR नोंदवून सखोल तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

दिशा सालियन यांचा मृत्यू ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरात झाला होता. त्यांच्या मृत्यूची प्राथमिक चौकशी मुंबई पोलिसांकडून करण्यात आली होती. मात्र, तपासाच्या पद्धतीवर आणि दीर्घकाळ FIR नोंदवण्यात न आल्याबाबत उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले.

या प्रकरणात दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी गंभीर आरोप करत नव्याने तपासाची मागणी केली होती. त्यांच्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने CBI चौकशीचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने मात्र पुरेसा पुरावा किंवा तपासातून वाजवी संशय निर्माण होईपर्यंत कोणत्याही व्यक्तीला आरोपी मानू नये, असे स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांचे नाव राजकीय आरोपांमुळे चर्चेत आले आहे. ठाकरे यांनी आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे CBIच्या तपासात नेमके काय निष्पन्न होते, याकडे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता घटनास्थळाचा तपास, पूर्वीच्या तपासातील बाबी, उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब यांचा नव्याने तपास होण्याची शक्यता आहे. CBIच्या तपासातून मृत्यूच्या परिस्थितीबाबत अधिक स्पष्टता मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दिशा सालियन मृत्यूप्रकरणातील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. CBIच्या तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारेच पुढील कायदेशीर निष्कर्ष स्पष्ट होतील.

या संपूर्ण प्रकरणाचा आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सविस्तर आढावा पाहा ‘आपलं नाशिक’च्या या एक्सप्लेनरमध्ये.

आपलं नाशिक | आपला आवाज