वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. वीजचोरी करताना सापडलेल्या ग्राहकाचं नाव आणि पत्ता सार्वजनिक करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे वीजचोरी करणाऱ्यांची माहिती आता लपून राहणार नाही.

नाशिकमध्ये वीजचोरी करून महावितरणच्या वीजवाहिन्यांवर अनधिकृतपणे वीजजोडणी करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. शहरासह ग्रामीण भागातही वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

संशयास्पद वीजवापर, अचानक कमी झालेला वापर किंवा इतर तांत्रिक निकषांच्या आधारे वीजचोरीची शक्यता असलेल्या जोडण्यांचा शोध घेतला जात आहे. यासाठी महावितरणकडून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आणि Machine Learning आधारित प्रणालीचाही वापर केला जात आहे.

या प्रणालीच्या माध्यमातून ग्राहकांच्या वीजवापराच्या पद्धतींचं विश्लेषण केलं जातं. त्यातून वीजचोरीची शक्यता असलेल्या ग्राहकांची माहिती शोधली जाते. त्यानंतर महावितरणच्या पथकांकडून संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी केली जाते.

नाशिक परिमंडळात यापूर्वीही वीजचोरीविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. आता या कारवाईला आणखी वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत राज्यात २७ हजार ९४६ वीजचोरीची प्रकरणं उघडकीस आली आहेत. या प्रकरणांमध्ये तब्बल २४ हजार ५०० कोटी रुपयांच्या वीजचोरीचं मूल्यांकन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

वीजचोरीमुळे महावितरणला आर्थिक नुकसान होतं. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम वीजव्यवस्थेवर आणि नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवर होण्याची शक्यता असते. त्यामुळे वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणकडून तपासणी आणि कारवाई अधिक तीव्र केली जात आहे.

नवीन निर्णयानुसार, वीजचोरी करताना आढळलेल्या ग्राहकाचं नाव आणि पत्ता सार्वजनिक केला जाणार आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाईसोबतच वीजचोरी करणाऱ्यांची ओळखही समोर येणार आहे.

ग्राहकांनीही आपल्या वीजमीटरकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मीटरमध्ये छेडछाड, अनधिकृत वीजजोडणी किंवा वीजवापरात संशयास्पद बदल आढळल्यास त्याची माहिती महावितरणला देणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वीज वापरा, पण वीजचोरी करू नका. कारण वीजचोरीचा फटका केवळ महावितरणला नाही, तर संपूर्ण वीजव्यवस्थेला बसतो.