जुन्या कसारा घाटात कंटेनर पलटी झाल्याने मुंबई-नाशिक मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर अपघातानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

कंटेनर पलटी झाल्यामुळे घाट परिसरात सुमारे १ ते २ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून, प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि वाहतूक पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर बाजूला हटवण्याचे काम सुरू करण्यात आले.

दीर्घ प्रयत्नांनंतर रस्ता मोकळा करण्यात आला असून, जुन्या कसारा घाटातील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मात्र अपघातामुळे साचलेली वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी अजून काही तास लागू शकतात, अशी शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी आणि वाहनांची सुरक्षित हालचाल सुनिश्चित करण्यासाठी मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतूक तूर्तास नवीन कसारा घाट मार्गे वळवण्यात आली आहे.

प्रशासनाकडून वाहनचालकांना परिस्थिती लक्षात घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आणि प्रवासादरम्यान काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.