राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३१ ऑक्टोबर रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले जात आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी तीन हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी पोलिस अकादमीतील जागेची चाचपणी सुरू असून, ओझरहून तीन हेलिकॉप्टरने आगमन होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संभाव्य लँडिंग ठिकाणांची पाहणी आणि बंदोबस्ताचा आढावा घेतला जात आहे.
३१ ऑक्टोबर रोजी दुपारी रामतीर्थावर सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमानंतर राष्ट्रपती त्र्यंबकेश्वरला भेट देण्याची शक्यता असून, गोदावरी आरतीला उपस्थित राहण्याचाही संभाव्य कार्यक्रम आहे.
राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन, हेलिकॉप्टर लँडिंग आणि पोलिस बंदोबस्ताबाबत प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. दौऱ्याचा अंतिम कार्यक्रम आणि सुरक्षा व्यवस्थेचा तपशील अधिकृत घोषणेनंतर स्पष्ट होईल.


