अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेले सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी मिळावे, या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. पाकनदी प्रकल्पात झालेल्या या आंदोलनात शेकडो महिला आणि पुरुष शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व मनोज चव्हाण यांनी केले.

 

सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळावे, ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. अनुदानाचा प्रश्न मार्गी लागावा आणि शासनाचे लक्ष वेधले जावे, यासाठी शेतकऱ्यांनी नदीत उभे राहून घोषणा दिल्या.

 

या आंदोलनादरम्यान आमदार उमेश यावलकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या प्रश्नावर येत्या २८ तारखेला मंत्रालयात बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

 

आता मंत्रालयात होणाऱ्या या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाबाबत काय निर्णय घेतला जातो, तसेच दिवाळीपूर्वी अनुदान देण्याच्या मागणीवर सरकार कोणती भूमिका घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.