नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेत त्यांना निमंत्रण दिले. येत्या ३१ ऑक्टोबरला कुंभमेळ्याच्या शुभारंभाचा सोहळा होणार आहे.

या विशेष भेटीदरम्यान कुंभमेळ्याच्या संकेतस्थळाचे आणि गीताचे लोकार्पण करण्यात आले. तसेच विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. कुंभमेळ्याचे महत्त्व आणि आध्यात्मिक संकल्पना अधोरेखित करणारे त्रिमितीय निमंत्रणही राष्ट्रपतींना सादर करण्यात आले.

यावेळी राष्ट्रपतींना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेली पैठणी, शबरीशी संबंधित भेटवस्तू आणि नाशिकच्या खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणाऱ्या भेटी देण्यात आल्या. या निमंत्रणाच्या माध्यमातून नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे दर्शन घडवण्यात आले.