नाशिकमध्ये काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियाना’अंतर्गत 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराला आजपासून सुरुवात होत आहे. गंगापूर धरण परिसरातील एमटीडीसी ग्रेप पार्क येथे हे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असून, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना संघटन मजबूत करण्यासोबतच जनतेच्या प्रश्नांची प्रत्यक्ष जाण करून देण्यावर या शिबिरात भर दिला जाणार आहे.

या प्रशिक्षण शिबिराचे स्वरूप पूर्णपणे Residential आणि Closed-Door असणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या 72 जिल्हा आणि शहरातील प्रशिक्षणार्थींना ग्रामीण भागात प्रत्यक्ष पाठवण्यात येणार आहे. गावात एक दिवस मुक्काम करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याचा विशेष Task प्रशिक्षणार्थींना देण्यात आला आहे.

काँग्रेसच्या या उपक्रमामध्ये केवळ संघटनात्मक प्रशिक्षण न देता Ground Level Experience देण्यावरही भर देण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थींना मनरेगाच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासोबतच श्रमदानात सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न समजून घेण्याची संधी मिळणार आहे.

या शिबिरात राष्ट्रीय वॉर रूमचे अध्यक्ष शशिकांत सेंथिल आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मार्गदर्शन करणार आहेत. संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांचा जनतेशी थेट संपर्क वाढवणे आणि आगामी काळातील राजकीय आव्हानांसाठी पदाधिकाऱ्यांना तयार करणे, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या 10 दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचा 2 सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनामुळे या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या काँग्रेस प्रशिक्षण शिबिरातून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला किती बळ मिळणार आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नांवर पक्षाचे पदाधिकारी कशा पद्धतीने काम करणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.