नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अंबड परिसरातील निलेश कोतकर यांच्या मृत्यूनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर कार्यालयात ठिय्या आंदोलन करत महापौर आणि महापालिका आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

आंदोलन सुरू असतानाच ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे आणि शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे आमनेसामने आले. दोन्ही गटांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली आणि एकमेकांवर "स्टंटबाजी" केल्याचे आरोप करण्यात आले.

दरम्यान, शिंदे गटाने आंदोलनावरील आरोप फेटाळून लावत अंबड परिसरातील मृत निलेश कोतकर यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्याची माहिती दिली.

निलेश कोतकर यांच्या मृत्यूनंतर शहरातील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शहरातील रस्ते खड्डेमुक्त कधी होणार, याकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे.