नाशिकमध्ये विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि उपोषण गेल्या १५ दिवसांपासून सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मंत्री अशोक उईके यांच्यासोबत चर्चा होऊनही अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.

मागण्या तातडीने मान्य करून त्यावर ठोस निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. चर्चा होऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

याच पार्श्वभूमीवर मंगळवारी आदिवासी विद्यार्थी आयुक्त कार्यालयावर मोठा मोर्चा काढणार आहेत. मोठ्या संख्येने विद्यार्थी या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.

गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे प्रशासन आता कोणती भूमिका घेणार आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय तोडगा निघणार, याकडे नाशिककरांचं लक्ष लागलं आहे.