नाशिकमधील नारायण बापूनगर परिसरात सोमवारी सकाळी रस्त्यालगत असलेल्या उघड्या डीपीमुळे एका गाईचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित डीपीला संरक्षक झाकण नसल्यामुळे यापूर्वीही अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, आवश्यक उपाययोजना न झाल्याने ही घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

घटनास्थळ वर्दळीचे असून येथे नियमित भाजी बाजार भरतो. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने तातडीने डीपी सुरक्षित करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.