नाशिकच्या विविध रिक्षा संघटना बेकायदेशीर प्रवासी वाहतूक आणि अॅप आधारित टॅक्सी सेवांविरोधात आक्रमक झाल्या आहेत. संबंधित वाहनांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या मागणीसाठी आज रिक्षाचालक मंत्रालयावर मोर्चा काढत आहेत.
बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीमुळे परवानाधारक रिक्षाचालकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला आहे. संबंधित वाहनमालकांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आरटीओ प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, रामवाडी येथे झालेल्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. भद्रकाली ऑटोरिक्षा युनियनसह विविध रिक्षा संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
अॅप आधारित टॅक्सी सेवा आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीमुळे परवानाधारक रिक्षाचालकांसमोर निर्माण झालेल्या अडचणींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा रिक्षा संघटनांनी दिला आहे. त्यामुळे या आंदोलनानंतर आरटीओ आणि शासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.


