नाशिक शहरातील संत गाडगे महाराज पुलाजवळ बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. सराफ बाजार आणि मेन रोड परिसरातील काही व्यापारी आपली वाहने पुलाजवळ पार्क करून दुकानांकडे जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
या वाहन पार्किंगचा थेट परिणाम पंचवटीहून मेन रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांवर होत आहे. पुलाजवळ रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी होत असून, वाहनांच्या संथ गतीमुळे कोंडी निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेषतः सायंकाळच्या वेळी या परिसरात वाहनांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पुलाजवळील बेशिस्त आणि बेकायदेशीर पार्किंगवर संबंधित यंत्रणेने कारवाई करावी तसेच परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.


