नाशिक : शहरातील पंधरा ठिकाणी पाइपलाइनची गळती बंद करणे आणि अत्यावश्यक दुरुस्तीची कामे करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडून शनिवारी, २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण शहरात शटडाउन घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी दिवसभर शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून, रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी सकाळीही कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महापालिकेच्या सहा प्रमुख विभागांमध्ये दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार असून, त्यासाठी अंदाजे बारा ते अठरा तासांचा कालावधी लागणार आहे. पंचवटीतील पेठरोड आणि मखमलाबाद परिसरात आधीपासूनच अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने येथील नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागू शकतो. टंचाई जाणवणाऱ्या भागांत पाणीपुरवठा करण्यासाठी खासगी तेवीस आणि महापालिकेचे सहा, अशा एकूण २९ टँकरचे नियोजन करण्यात आले आहे. पंचवटीसह सिडकोतील दाट लोकवस्तीच्या भागांत मागणीनुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
गळतीमुळे होणारा पाण्याचा अपव्यय रोखणे आणि जुन्या पाइपलाइनमधील दोष दूर करणे हा या दुरुस्तीमागील उद्देश आहे. सातपूर तसेच कॅनाल रोडवरील संत कबीरनगर परिसरातील गळतीची कामेही यावेळी केली जाणार आहेत.
याबाबत पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र धारणकर यांनी सांगितले की, गळतीची दुरुस्ती झाल्यानंतर पाण्याचा अपव्यय कमी होऊन पुढील काळात गळतीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.


