नाशिकमध्ये दुकान मालकाचा विश्वास संपादन करून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या आरोपीला आडगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. द्वारका सर्कल परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चोरीतील बहुतांश मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी शेषराव चौधरी यांच्या स्वागत स्वीट्स या मिठाईच्या दुकानात काम करणारा अरविंद गणेश पुरोहित उर्फ अरविंद सिंग याने विश्वास संपादन करून दुकानातील रोख रक्कम, लॅपटॉप आणि चांदीचे कडे असा सुमारे ₹3 लाख 4 हजारांचा मुद्देमाल चोरी करून फरार झाला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक दिलीप राठोड यांच्या पथकाला आरोपी द्वारका येथून बसने पुण्याकडे जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार द्वारका सर्कल परिसरात सापळा रचण्यात आला. तोंडावर रुमाल बांधून आलेल्या संशयिताला पोलीस हवालदार वाघ यांनी ओळख पटवली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून त्याला जेरबंद केले.
पोलिसांनी आरोपीकडून ₹2 लाख 31 हजार 100 रुपयांची रोख रक्कम, ₹10 हजारांचा लॅपटॉप आणि ₹20 हजारांचे चांदीचे कडे असा एकूण ₹2 लाख 61 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आडगाव पोलीस करत असून आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


