नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने गुजरातमधील वडोदरा येथून आंतरराज्य रेकॉर्डवरील सराईत आरोपीला अटक करत घरफोडी आणि मोटारसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत आरोपीकडून १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने गुजरातमधील वडोदरा येथे सापळा रचून मुख्य आरोपी भगतसिंग शिकलीगार याला ताब्यात घेतले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान गिरे यांच्या पथकाने केलेल्या चौकशीत आरोपीने घरफोडीसह आणखी दोन गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीकडून मोबाईल फोन आणि होंडा शाईन मोटारसायकलसह एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणातील फरार साथीदारांचा शोध सुरू असून, पुढील तपास नाशिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.