नाशिक जिल्ह्यात हार्डवेअर दुकानांमध्ये चोऱ्या करणाऱ्या एका सराईत आणि अट्टल चोरट्याला लासलगाव पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव खुर्शीद अब्दुल हमीद खान असून, तो मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मंगळवारी मध्यरात्री विंचूर परिसरातील हार्डवेअर दुकानाचे शटर तोडून तांब्याच्या वायरची चोरी करण्यात आली होती. या घटनेनंतर लासलगाव पोलिसांच्या पथकाने तपास सुरू करत संशयिताचा माग काढला.
पोलिसांनी संशयिताचा पाठलाग करत त्याला विंचूर एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीतील तांब्याच्या वायर, एक सॅन्ट्रो कार, बोल्ट कटर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती आहे. चोरीसाठी वापरले जाणारे साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे.
विशेष म्हणजे, या संशयिताविरोधात नाशिक जिल्ह्यातील सायखेडा, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी, सिन्नर, इगतपुरी रेल्वे, सटाणा, चांदवड आणि लासलगाव यांसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल १२ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
सराईत चोरट्याला पकडण्यात लासलगाव पोलिसांना यश आल्याने विंचूर परिसरातील दुकानफोडीच्या घटनांबाबत महत्त्वाचा तपास पुढे आला आहे.
या प्रकरणात चोरीमागील इतर साथीदारांचा सहभाग आहे का, तसेच आणखी काही गुन्ह्यांची उकल होते का, याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


