मुंबईतील आझाद मैदानात दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. तळमळीची गर्जना संस्थेच्या वतीने आयोजित या आंदोलनात महाराष्ट्राच्या विविध भागांतून सुमारे पन्नास दिव्यांग सहभागी झाले आहेत. सध्या मिळणारे मासिक अनुदान वाढवून सात हजार रुपये करावे, ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.

सध्या दिव्यांगांना मिळणारे अडीच हजार रुपयांचे मासिक अनुदान वेळेवर मिळत नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली आहे. त्यामुळे अनुदानात वाढ करण्यासोबतच प्रलंबित अनुदानाची रक्कमही तातडीने मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय दिव्यांगांना रोजगार संरक्षण मिळावे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र कार्यालये सुरू करण्यात यावीत, अशा मागण्याही आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

या आंदोलनात वैशाली इंगवले, भारती उबले, श्रीरंग संतोष, दीपक कुलकर्णी आणि अविनाश गायकवाड यांच्यासह दिव्यांग आंदोलक सहभागी झाले आहेत. दिव्यांगांच्या मागण्यांबाबत शासनाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.