नाशिक महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखल्यांमधील कथित फेरफार प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत १५ हजार ६८९ दाखल्यांची तपासणी पूर्ण झाली असून, त्यापैकी ६९० नोंदींमध्ये बदल झाल्याचे आढळले आहे. यातील ५४७ नोंदींमध्ये गंभीर स्वरूपाचे, तर १४३ नोंदींमध्ये किरकोळ स्वरूपाचे बदल झाल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे. अद्याप ७३० दाखल्यांची तपासणी बाकी आहे.

या प्रकरणातील कथित अनियमिततेचा मुद्दा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला होता. त्यांनी नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी महापालिकेने विभागीय स्तरावर सहा समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांकडून २०१६ पूर्वीच्या जन्म-मृत्यू दाखल्यांची पडताळणी केली जात आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, तपासणी पूर्ण झालेल्या १५ हजार ६८९ दाखल्यांपैकी १४ हजार २६९ नोंदी ऑनलाइन पोर्टलवरील माहितीनुसार जशाच्या तशा आढळल्या आहेत. तर ६९० नोंदींमध्ये बदल झाल्याचे समोर आले आहे. प्रभारी मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांनी या बदलांपैकी ५४७ गंभीर, तर १४३ किरकोळ स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, २०१६ मध्ये जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी सीआरएस ऑनलाइन प्रणाली लागू करण्यात आली. मात्र, नाशिक महापालिकेत ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित नसल्यामुळे ऑफलाइन दाखल्यांमध्ये फेरफार होण्याची शक्यता असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. यापूर्वी त्यांनी १८ जन्मदाखल्यांमधील मोठ्या प्रमाणावरील बदलांचाही मुद्दा उपस्थित केला होता.

सध्या ६९० नोंदींमध्ये बदल झाल्याचे समोर आले असले, तरी या बदलांचे नेमके स्वरूप, त्यामागील कारणे आणि नियमबाह्य प्रकार घडले आहेत का, हे पुढील तपासणीत स्पष्ट होणार आहे. उर्वरित ७३० दाखल्यांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाचे संपूर्ण चित्र समोर येण्याची शक्यता आहे. चौकशीअंती महापालिका प्रशासन काय निष्कर्ष काढते आणि दोष आढळल्यास कोणती कारवाई करते, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.