परभणी :   परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात दूधभेसळीचा संशय निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दूध तापवताच त्याचे रबरसदृश पदार्थात रूपांतर झाल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, पूर्णा शहरातील एका नागरिकाने खासगी विक्रेत्याकडून दूध खरेदी केले होते. हे दूध तापवित असताना त्याचे अचानक रबरसदृश घट्ट पदार्थात रूपांतर झाल्याचे संबंधित नागरिकाने सांगितले.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी संबंधित दुधाचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.

दरम्यान, संबंधित दूध विक्रेत्याची चौकशी सुरू असून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच दुधामध्ये भेसळ होती की अन्य काही कारण होते, हे स्पष्ट होणार आहे. अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.