नागपूर : नागपुरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आणखी एका नामांकित मिठाई आणि नमकीन उत्पादकावर मोठी कारवाई केली आहे. गंभीर अन्नसुरक्षा नियमभंग आढळल्यानंतर इंदूर नमकीन प्रॉडक्ट्सचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे.
एफडीएच्या पथकाने कामठी मार्गावरील इंदूर नमकीन प्रॉडक्ट्सच्या कारखान्याची तपासणी केली असता, तेथे मुदतबाह्य तसेच बुरशी लागलेले अन्नपदार्थ आढळून आले. याशिवाय उत्पादन परिसरात अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचेही निदर्शनास आले.
या कारवाईदरम्यान एफडीएने कारखान्यातील तब्बल 273 किलो अन्नसाठा जागेवरच नष्ट केला. तसेच अन्नसुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित आस्थापनेचा परवाना तात्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे.
अलीकडच्या काळात राज्यभरात अन्नसुरक्षेबाबत प्रशासन अधिक सतर्क झाले असून, निकृष्ट व असुरक्षित अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांविरोधात कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


