नाशिकच्या प्रसिद्ध नवश्या गणपती मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, मोठमोठे खड्डे आणि चिखलामुळे भाविक व स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्याची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

गंगापूर रोडवरील आनंदवल्ली परिसरात असलेल्या नवश्या गणपती मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतुकीवरही परिणाम होत असल्याचे सांगितले आहे. खराब रस्त्यामुळे भाविक, वाहनचालक आणि परिसरातील रहिवाशांना दररोज अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे हा परिसर महापालिकेच्या उपमहापौरांच्या प्रभागात येत असूनही रस्त्याची दुरवस्था कायम असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून भाविक आणि वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.