हरियाणातील जिंद जिल्ह्यातील मनोहरपूर गावात तब्बल ३५ वर्षांनंतर दोन सख्ख्या भावांची भावनिक भेट झाल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. पंजाबमधील मतदारयादीच्या विशेष पुनरिक्षण अर्थात SIR मोहिमेच्या निमित्ताने ५५ वर्षीय सीताराम आपल्या जुन्या शाळेत आले आणि याच योगायोगाने वर्षानुवर्षे तुटलेली कुटुंबाची नाळ पुन्हा जोडली गेली.

शाळेचा दाखला सादर करण्यासाठी आलेल्या सीताराम यांनी आपले मूळ गाव मनोहरपूर असल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी आपल्या मोठ्या भावाचे नाव दलवीर असल्याची माहिती दिली. ही माहिती स्थानिक मतदान केंद्र अधिकारी कृष्णकुमार यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी दलवीर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या भावाबाबत माहिती दिली.

माहिती मिळताच ६० वर्षीय दलवीर तातडीने शाळेत पोहोचले. तब्बल ३५ वर्षांनंतर एकमेकांसमोर आलेल्या दोन्ही भावांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. अनेक वर्षांच्या विरहानंतर झालेल्या या भेटीमुळे दोघांचेही अश्रू अनावर झाले आणि उपस्थितांचेही डोळे पाणावले.

मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षांपूर्वी घर सोडल्यानंतर सीताराम अमृतसरमध्ये वास्तव्यास होते, तर मोठे भाऊ दलवीर मनोहरपूर गावातच राहत होते. काळाच्या ओघात दोघांचा संपर्क तुटला. मात्र, मतदारयादीच्या SIR मोहिमेसाठी सीताराम जुन्या शाळेत आल्यानंतर हा विलक्षण योगायोग घडला आणि दोन्ही भावांची पुन्हा भेट झाली.

ही घटना केवळ दोन भावांच्या भेटीपुरती मर्यादित नसून, वर्षानुवर्षे तुटलेले नाते पुन्हा जोडणारी एक हृदयस्पर्शी कहाणी ठरली आहे. मतदारयादीच्या प्रक्रियेच्या निमित्ताने घडलेल्या या अनपेक्षित भेटीने कुटुंबातील नात्यांची ताकद आणि माणुसकीची भावनिक बाजू पुन्हा एकदा समोर आणली आहे.

आपलं नाशिक | आपला आवाज