नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये गोदावरीच्या तीरावर भव्य गोदाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता सुमारे साडेसहा हजार नाशिककर एकाच वेळी गोदाआरती करणार आहेत. या भव्य सोहळ्याची विश्वविक्रमासाठी नोंद करण्याचे नियोजन सुरू असून, यामुळे नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर पडण्याची अपेक्षा आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मंगल पर्वाची नांदी ठरणारा ध्वजारोहण सोहळा ३१ ऑक्टोबर रोजी रामकुंड परिसरात पार पडणार आहे. याच दिवशी सायंकाळी गोदावरीच्या तीरावर सामूहिक आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. नियमितपणे होणाऱ्या गोदाआरतीला या दिवशी व्यापक स्वरूप प्राप्त होणार असून, हजारो भाविक एकाच वेळी आरतीच्या ज्योती प्रज्वलित करणार आहेत.

या सोहळ्याच्या नियोजनासाठी सिंहस्थ प्राधिकरणाच्या समन्वयातून तयारी सुरू आहे. आरतीमध्ये सहभागी होणाऱ्या साडेसहा हजार भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने एकाच वेळी आरती करता यावी, यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने गोदाघाट परिसरातील गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांची ये-जा आणि आवश्यक सुविधांच्या नियोजनावर भर दिला जात आहे.

राष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाच्या सुरक्षा व्यवस्थेलाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संबंधित यंत्रणांकडून सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. सामूहिक गोदाआरतीच्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वाला भक्तिमय प्रारंभ होण्याची अपेक्षा आहे. विश्वविक्रमासाठी या सोहळ्याची नोंद होणार का, याकडेही नाशिककरांचे लक्ष लागले आहे.