नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये भगवामय वातावरण निर्माण करण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी ‘हर घर भगवा’ हे अभियान राबवण्यात येणार असून, दोन्ही शहरांतील घरांवर एक लाख भगवे ध्वज फडकवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोजागरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर रविवार, २५ ऑक्टोबर रोजी या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे. सिंहस्थाच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उत्साह निर्माण करणे आणि भाविकांच्या स्वागतासाठी शहराला धार्मिक व सांस्कृतिक साज देणे, हा या मोहिमेमागील उद्देश आहे.

अभियान यशस्वी करण्यासाठी दोन हजारांहून अधिक बूथप्रमुखांना जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिकमधील भाजपचे एक हजार ४७, तर शिवसेनेचे एक हजार बूथप्रमुख या उपक्रमात सहभागी होणार आहेत. शहरातील आमदार आणि नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजवाटप व उभारणीचे नियोजन केले जात आहे. नाशिक शहरात ७५ हजार, तर त्र्यंबकेश्वरमध्ये २५ हजार भगवे ध्वज लावण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

या मोहिमेसाठी इंदूर, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर येथे ध्वजनिर्मितीची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रांवर तयार होणारे ध्वज नाशिकमध्ये पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळवून सिंहस्थाच्या स्वागतासाठी शहरात उत्सवी वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील घरांवर भगवे ध्वज फडकताना दिसणार आहेत.