मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या जाहिरातबाजीवरून पक्षातच चर्चा सुरू झाली आहे. यावर भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
शहरात लागलेले होर्डिंग्ज आणि वर्तमानपत्रांमधील जाहिराती भाजपच्या अधिकृत नसल्याचं सुनील केदार यांनी स्पष्ट केलं. भाजपमध्ये केंद्र, प्रदेश, जिल्हा आणि मंडल स्तरापर्यंत प्रत्येक बाबतीत पक्षाचा ठरलेला प्रोटोकॉल आहे. लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी येतील-जातील; मात्र पक्षाचा ढाचा बदलणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
पक्षाच्या अधिकृत ई-मेलवरून किंवा पक्ष कार्यालयातून दिल्या जाणाऱ्या जाहिराती आणि बातम्याच अधिकृत असल्याचं केदार यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री, मंत्री किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते शहरात आले असताना हितचिंतक किंवा लाभार्थी स्वागताचे बॅनर, होर्डिंग्ज आणि जाहिराती देऊ शकतात. मात्र, त्या भाजपच्या अधिकृत जाहिराती नसतात, असं त्यांनी सांगितलं.
वैयक्तिक जाहिरातबाजी करणाऱ्यांवरही केदार यांनी निशाणा साधला. “ज्यांनी वैयक्तिक जाहिरातबाजी केली, तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. भाजपच्या विचारधारेशी त्याचा काहीही संबंध नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
यानंतर केदार यांनी भाजपच्या दिग्गज नेत्यांचा दाखला दिला. “बॅनर, होर्डिंग्ज आणि जाहिराती करूनच जर राजकारण करता आलं असतं, तर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी आणि गोपीनाथ मुंडे यांसारख्या नेत्यांनी वाड्या-वस्त्यांवर, खेडोपाडी जाऊन पक्षाचा प्रचार-प्रसार केला नसता,” असं केदार यांनी म्हटलं.
राजकारणात प्रसिद्धीपेक्षा जनसंपर्क, काम आणि संघर्ष महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. “राजकीय यश मिळवण्यासाठी लोकांमध्ये जावं लागतं, त्यांची कामं करावी लागतात, संघर्ष करावा लागतो. पक्षाचं काम करताना वैचारिक अधिष्ठान महत्त्वाचं आहे,” असा संदेश सुनील केदार यांनी दिला.


