भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने आठ तालुक्यांमधील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार मालेगाव, नांदगाव, बागलाण, कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा या आठ तालुक्यांतील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, अंगणवाड्या, आश्रमशाळा तसेच सर्व प्रकारची महाविद्यालये आज बंद राहणार आहेत.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून संबंधित शैक्षणिक संस्थांनी त्याची अंमलबजावणी करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पालक आणि नागरिकांनी हवामान विभाग तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


