नाशिक : जून महिना संपेपर्यंत पावसाने दडी मारल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा चिंताजनकरीत्या घटला होता. त्यामुळे दर शनिवारी पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून सध्या तो 70 टक्क्यांवर पोहोचला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल 518 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील वर्षी जुलै 2025 मध्ये याच कालावधीत गंगापूर धरणात सुमारे 75 टक्के पाणीसाठा होता. त्यावेळी धरणातून सुमारे 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.
यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे 5 टक्के पाणीसाठा कमी असला, तरी सलग झालेल्या पावसामुळे नाशिकच्या पाणीपुरवठ्यावरील चिंता काहीशी कमी झाली आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


