नाशिक : नाशिकच्या उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील जिजामाता नगर परिसरात जुन्या वादातून झालेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीवर धारदार चॉपरने जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून घराबाहेर उभ्या असलेल्या दोन स्कूल व्हॅनचीही तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास जिजामाता नगर, पेंढारकर कॉलनी येथे जुन्या वादाच्या कारणावरून दोन गट आमनेसामने आले. यावेळी सचिन गाडेकर यांना शिवीगाळ करत प्लास्टिकचे दांडे, लाकडी दांडे आणि काठ्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
फिर्यादीनुसार, राजेंद्र ताजणे उर्फ कन्नू ताजणे यांच्या मुलाने सचिन गाडेकर यांच्यावर धारदार चॉपर फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडेकर वेळीच बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर आरोपींनी घराबाहेर उभ्या असलेल्या दोन टाटा विंगर स्कूल व्हॅनच्या काचा फोडून नुकसान केले.
या प्रकरणी उपनगर पोलिसांनी राजेंद्र ताजणे, त्यांचा मुलगा, मधुकर पाटील, सचिन शिंगारे तसेच ३ ते ४ अनोळखी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.


