नाशिकरोड : येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात उपचारादरम्यान कथित हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप अहिरे कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत अहिरे यांच्या पत्नी दिपाली अहिरे यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सलग तीन दिवस नॉर्मल डिलिव्हरी होईल असे सांगत विविध औषधे आणि इंजेक्शन देण्यात आले. अनेक वेळा सिझेरियन शस्त्रक्रियेची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
https://www.aplanashik24.tv/nashik-news/hingoli-earthquake-four-tremors-40-villages
कुटुंबीयांनी सांगितले की, महिलेच्या पोटातील बाळाने शौच केल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आल्यानंतर सिझेरियनचा निर्णय घेण्यात आला. मात्र, भूल देण्यात अडचणी येत असल्याचे सांगत महिलेला अन्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला.
यानंतर दिपाली अहिरे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर बाळाच्या हृदयाचे ठोके लागत नसल्याचे सांगितले. त्यानंतर करण्यात आलेल्या सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर बाळ मृतावस्थेत जन्माला आल्याची माहिती समोर आली.
या घटनेनंतर अहिरे कुटुंबीयांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनानेही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अंतर्गत समिती नेमल्याची माहिती दिली आहे. चौकशी अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


