नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी नाशिक शहरात प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असली, तरी गोदाघाटावरील भाविकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. रामसेतूला पर्याय म्हणून उभारण्यात येणाऱ्या 'रामझुल्या'चे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे ध्वजारोहण आणि गोदावरी महाआरतीसाठी येणाऱ्या लाखो भाविकांची मदार या जीर्ण रामसेतूवरच राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

सुमारे सत्तर वर्षांपूर्वी उभारलेल्या या रामसेतूने अनेक महापुरांचे तडाखे सहन केले आहेत. पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर तो पाडण्याबाबत चर्चा झाली होती; मात्र पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने हा निर्णय वारंवार पुढे ढकलण्यात आला. त्यातच रामझुल्याच्या मूळ आराखड्यात अलीकडेच बदल करण्यात आल्याने कामाचा वेग मंदावला असून, सिंहस्थापूर्वी तो पूर्ण होण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

सध्या रामसेतूवरील लोखंडी संरक्षक कठडे गायब झाले असून, सुरक्षेसाठी केवळ बांबूंचा तात्पुरता आधार देण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर नाशिककरांमधून तीव्र ताशेरे ओढले जात आहेत. सिंहस्थादरम्यान होणारी अभूतपूर्व गर्दी आणि वाहतूक व्यवस्थापन जीर्ण पुलावरून कसे सांभाळले जाणार, हा कळीचा मुद्दा बनला आहे. आता प्रशासन रामझुल्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी कोणती ठोस पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.