नाशिक : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २५ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. सामूहिक शंखनाद, ग्रामपरिक्रमा, शोभायात्रा, ध्वजारोहण आणि गोदावरी महाआरती अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून सिंहस्थ सोहळ्याचे वातावरण निर्माण केले जाणार आहे. या उपक्रमांमुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये धार्मिक उत्साहाचे वातावरण राहणार आहे.
रविवारी, २५ ऑक्टोबरला सायंकाळी पाच ते सात या वेळेत गोदाघाटावरील यशवंतराव महाराज देवमामलेदार मैदानावर ५०१ शंखांचा सामूहिक निनाद करण्यात येणार आहे. अनंत विजय शंखनाद ग्रुपच्या सहकार्याने होणाऱ्या या उपक्रमातून ३०३ शंखांच्या पूर्वीच्या विक्रमाला मागे टाकण्याचे उद्दिष्ट आहे. त्र्यंबकेश्वरमध्येही याचवेळी शंखनादाचे आयोजन करण्यात आले आहे.
२६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान ‘हर घर कुंभध्वज’ उपक्रम राबविण्यासह मुख्य सोहळ्याची तयारी केली जाणार आहे. शुक्रवारी, ३० ऑक्टोबरला नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधींनंतर ग्रामपरिक्रमा आणि शोभायात्रा काढण्यात येतील.
शनिवारी, ३१ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी अभिजीत मुहूर्तावर ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा होणार आहे. नाशिकच्या रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, तर त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होईल.
याच दिवशी सायंकाळी रामकुंड ते अहिल्याबाई होळकर पूल परिसरात सुमारे सहा हजार ५०० जनजाती बांधवांच्या सहभागातून गोदावरी महाआरतीचे नियोजन आहे. याशिवाय सिंहस्थ प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण, कॉफी टेबल बुकचे प्रकाशन, विशेष टपाल तिकिटाचे अनावरण आणि कुंभगीताचे लोकार्पण असे विविध कार्यक्रमही पार पडणार आहेत.


