नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची तयारी सुरू असून, या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले जात आहे. ३० ऑक्टोबर रोजी होणारी नगरप्रदक्षिणा मिरवणूक आणि ३१ ऑक्टोबर रोजी रामकुंडावर होणारा मुख्य ध्वजारोहण सोहळा लक्षात घेऊन वाहतूक शाखेने महापालिकेकडे महत्त्वाची मागणी केली आहे.

शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी फटाके आणि इतर विक्री स्टॉल्स उभारण्यास परवानगी देऊ नये, अशी लेखी विनंती वाहतूक पोलिसांनी केली आहे. या कार्यक्रमांदरम्यान मोठ्या प्रमाणात भाविक आणि नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत ठेवणे आणि वाहनांच्या पार्किंगचे नियोजन करणे आवश्यक आहे.

स्टॉल्समुळे गर्दी वाढल्यास वाहतुकीला अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ही मागणी केली आहे. मात्र, स्टॉल्सबाबत अंतिम निर्णय महापालिकेकडून घेतला जाणे अपेक्षित आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सुरळीत आयोजनासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधला जात असून, ध्वजारोहण सोहळ्याच्या व्यवस्थेकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.