नाशिक : शहरासह परिसरात ऑक्टोबरच्या अखेरीस उन्हाचा तडाखा पुन्हा वाढू लागला आहे. शुक्रवारी (दि. २३) दुपारपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने कमाल तापमानाने ३५.१ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. दिवसा कडक ऊन आणि उकाडा जाणवत असताना पहाटेच्या सुमारास गोदाकाठ परिसरात हलके धुके पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शुक्रवारी शहरातील किमान तापमान २०.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, तर कमाल तापमान ३५.१ अंशांपर्यंत पोहोचले. पहाटेच्या धुक्यामुळे वातावरणातील आर्द्रतेत वाढ झाली होती. सकाळी आर्द्रतेचे प्रमाण ६६ टक्के, तर सायंकाळी ते ३७ टक्के नोंदविण्यात आले. त्यामुळे सकाळच्या वेळेत वातावरणात काहीसा ओलसरपणा जाणवला, मात्र दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका अधिक तीव्र झाला.

ऑक्टोबर महिन्याचे अखेरचे दहा दिवस शिल्लक असताना तापमानातील वाढ नागरिकांची चिंता वाढवणारी ठरत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शुक्रवारपासून सोमवारपर्यंत (दि. २६) नाशिक शहरासह जिल्ह्यात आकाश प्रामुख्याने निरभ्र राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळातही उन्हाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिवसा उकाड्याचा त्रास होत असला, तरी रात्री अकरानंतर वातावरणात काहीसा गारवा जाणवतो. दिवस-रात्रीच्या तापमानातील या बदलांमुळे सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे आणि उन्हापासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.