नाशिक : शहराचा अधिकृत पक्षी कोण असावा, याचा निर्णय आता नाशिककरांच्या मतांमधून होणार आहे. ‘आपलं पर्यावरण’ संस्थेने पक्षी संवर्धन आणि पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला असून, कावळा आणि गिधाड या दोन पक्ष्यांमध्ये ही अनोखी निवडणूक रंगणार आहे. मतदानासाठी तयार करण्यात आलेल्या क्यूआर कोडचे अनावरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. सोशल मीडियावरही दोन्ही पक्ष्यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.

पाच ते बारा नोव्हेंबरदरम्यान साजऱ्या होणाऱ्या पक्षी सप्ताहाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर महापौर हिमगौरी आडके यांनी पहिले मतदान करून नाशिककरांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि वनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनीही या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.

या निवडणुकीत गिधाड आणि कावळा या दोन्ही पक्ष्यांना विशेष महत्त्व आहे. रामायणातील जटायूशी संबंधित गिधाडांची प्रजाती नामशेष होण्याच्या धोक्याचा सामना करत आहे. अंजनेरी आणि ब्रह्मगिरी परिसर हा गिधाडांचा नैसर्गिक अधिवास मानला जातो. दुसरीकडे, रामकुंडावरील दशक्रिया विधींमध्ये कावळ्याला धार्मिक महत्त्व आहे.

नागरिकांना १० नोव्हेंबरपर्यंत आपलं पर्यावरणच्या संकेतस्थळावर ऑनलाइन मतदान करता येणार आहे. १२ नोव्हेंबरला महापौर निकाल जाहीर करणार आहेत. या निमित्ताने पक्ष्यांचे पर्यावरणातील महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनाची गरज नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.