मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे भेळभत्ता खाल्ल्यानंतर तब्बल १८६ जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. आठवडी बाजारात भेळभत्ता आणि चटणी खाल्ल्यानंतर नागरिकांना उलटी, जुलाब आणि मळमळ यासारखा त्रास सुरू झाला. या घटनेनंतर आरोग्य विभागाने तातडीने गावात सर्वेक्षण सुरू करत बाधित रुग्णांना उपचारासाठी मालेगाव येथील विविध रुग्णालयांमध्ये दाखल केले.

आरोग्य विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, भेळभत्त्यासोबत देण्यात आलेल्या चटणीमुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चटणीसह भेळभत्ता खाल्लेल्या नागरिकांनाच त्रास झाल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले, तर चटणीशिवाय भेळ खाल्लेल्या काही नागरिकांना त्रास झाला नसल्याचे समोर आले आहे.

रुग्णांची संख्या वाढल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. बाधित रुग्णांवर मालेगावमधील सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय तसेच इतर आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत. बाधितांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश आहे. एका बालकाची प्रकृती खालावल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इतर रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील भेळभत्ता आणि चटणीचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रयोगशाळेच्या अहवालानंतर विषबाधेचे नेमके कारण अधिक स्पष्ट होणार आहे. संबंधित विक्रेत्याबाबतही प्रशासन आणि पोलिसांकडून कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त आहे.

घटनेनंतर नांदगाव बुद्रुक परिसरात आरोग्य विभागाची पथके तैनात करण्यात आली असून, बाधित नागरिकांच्या आरोग्याची तपासणी आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. अचानक मोठ्या संख्येने नागरिक आजारी पडल्याने परिसरात चिंता निर्माण झाली असून, प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

आपलं नाशिक | आपला आवाज