अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी आठ हजार २७ मतांनी विजय संपादन केला. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे यांचा पराभव झाला. पसंतीक्रमांक दोनच्या मतमोजणीत सरनाईक यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

विजयानंतर प्रतिक्रिया देताना किरण सरनाईक यांनी भाजपमधील बंडखोरीवर भाष्य केले. भाजपमधून बंडखोरी झाली नसती, तर पहिल्या पसंतीच्या मतांवरच विजय मिळवला असता, असे ते म्हणाले. उमेदवारीवरून भाजपच्या संगीता शिंदे आणि शेखर भोयर, तसेच शिवसेना शिंदे गटाचे डॉ. श्रीकांत देशपांडे यांनी बंडखोरी केली होती. पक्षाचा आदेश मानला असता, तर निवडणूक सोपी झाली असती, असेही सरनाईक यांनी सांगितले.

२०२० च्या निवडणुकीत किरण सरनाईक यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. यंदा त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करून महायुतीची उमेदवारी मिळवली. त्यांच्या विजयामुळे समर्थकांनी जल्लोष केला.