पनवेलमधील केवाळे येथे पावसाचे पाणी अडवण्यासाठी बंधाऱ्याच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या आवाहनाला प्रतिसाद देत कृषी विभाग आणि जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

भाजपा नेते प्रीतम म्हात्रे यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन सुरू असलेल्या बांधकामाचा आढावा घेतला. पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे आणि त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

जलसंधारण आणि पाणी बचतीसाठी नागरिकांनीही पुढाकार घेऊन अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रीतम म्हात्रे यांनी केले. पावसाचे पाणी साठवणे आणि त्याचा योग्य वापर करणे यासाठी स्थानिक पातळीवरील प्रयत्नांना या उपक्रमातून चालना देण्याचा प्रयत्न आहे.