लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा येथे २८ वर्षीय दत्ता सूर्यकांत कुंभार यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी होत असलेल्या कथित त्रासामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता कुंभार यांनी तीन ते चार खासगी फायनान्स कंपन्यांकडून सुमारे सहा लाख वीस हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. पतीच्या मृत्यूनंतरही फायनान्स कंपनीचे कर्मचारी कर्जवसुलीसाठी तगादा लावत असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

या घटनेनंतर शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. मृताच्या कुटुंबाचे संपूर्ण कर्ज माफ करावे, त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी द्यावी आणि संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.