लातूरमध्ये बालरंगभूमी परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जल्लोष लोककलेचा’ लोककला महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, तसेच बालकलावंतांना लोककलेच्या विविध प्रकारांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. बालरंगभूमी परिषदेकडून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अशा लोककला महोत्सवांचे आयोजन केले जात आहे.

या महोत्सवाच्या उद्घाटनावेळी सिने-नाट्य अभिनेत्री आणि बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड. नीलम शिर्के-सामंत यांनी आजच्या लावणीच्या सादरीकरणाच्या बदलत्या स्वरूपावर नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचा अविभाज्य भाग असलेल्या लावणीला सादर करताना तिच्या मूळ सांस्कृतिक स्वरूपाचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आजच्या काळात लावणीच्या सादरीकरणाला काही ठिकाणी वेगळे आणि आक्षेपार्ह स्वरूप प्राप्त होत असल्याचे मत नीलम शिर्के-सामंत यांनी व्यक्त केले. “आजकालच्या लावणीला आलेले स्वरूप खूप लज्जास्पद आहे. आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेतील ही लावणी नाही. हे थांबायला हवं,” असे ठाम मत त्यांनी मांडले.

लोककला ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. गोंधळ, भारूड, लावणी, पोवाडा, कोळीगीते, धनगरी नृत्य, वाघ्या-मुरळी आणि लेझीम यांसारख्या विविध लोककलांमधून महाराष्ट्राच्या लोकजीवनाचे दर्शन घडते. या कलाप्रकारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यावर बालरंगभूमी परिषद भर देत आहे.

बालकलावंतांना लोककलेची ओळख व्हावी आणि पारंपरिक कलाप्रकारांविषयी त्यांच्या मनात आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने ‘जल्लोष लोककलेचा’ उपक्रम राबवण्यात येत आहे. यापूर्वीही या उपक्रमाच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांमध्ये लोकनृत्य, लोकगीत, लोकवाद्य आदी प्रकारांमध्ये बालकलावंतांना सहभागी करून घेण्यात आले आहे.

दरम्यान, लावणीच्या सादरीकरणाच्या बदलत्या स्वरूपावर नीलम शिर्के-सामंत यांनी व्यक्त केलेल्या मतामुळे पारंपरिक लोककला, तिचे सादरीकरण आणि सांस्कृतिक मूल्ये यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.