बीड जिल्ह्यातील परळी शहरात कंटेनरचे डिझेल संपल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. परळीतील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर राखेची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचे डिझेल संपल्याने बीड आणि परभणी मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. या घटनेमुळे दोन्ही मार्गांवर सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

उड्डाणपुलापासून थेट शहरातील मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत वाहनांची गर्दी झाल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अचानक निर्माण झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे रस्त्यावरील वाहनांच्या हालचालींवर परिणाम झाला. दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती हाताळत वाहतूक सुरळीत केली.

या घटनेमुळे परळी शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी टोकवाडी ते कनेरवाडी बायपास मार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र, रेल्वेच्या कामामुळे हा बायपास गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याचे सांगण्यात येत आहे.

बायपास बंद असल्यामुळे शहरातील मुख्य मार्गांवर वाहतुकीचा ताण कायम असल्याचा मुद्दा नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. टोकवाडी ते कनेरवाडी बायपासचे काम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी कधी खुला होणार, असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे.